गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाच्या सुट्ट्या घालवण्यासाठी गावात आलेल्या एका चिमुकल्यावर काळाने घाला घातला. खेळता खेळता तो नाल्यात पडून वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविले. या शोधमोहिमेत नाल्यात मृतदेह आढळला.
रिशान प्रकाश पुंगाटी (वय वर्ष ६) असे चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकला गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील रहिवासी आहे. लाहोरी येथील शासकीय आश्रम शाळेत तो इयत्ता पहिलीत शिकत होता. पोळा सण साजरा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडे आणले होते. दरम्यान २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तो गावालगत असलेल्या नाल्याजवळ खेळायला गेला होता.
मात्र, खेळता खेळता तो नाल्यात पडला. गावकऱ्यांनी तात्काळ शोधमोहिम राबवली. मात्र, मुलाचा थांगपत्ता लागला नाही. महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा शोधमोहिम राबवली. तेव्हा चिमुकल्याचा मृतदेह नाल्यात आढळला. यानंतर त्याचा मृतदेह नाल्यातून काढत भामरागड येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे गावात पाणी भरलं होतं. पूर आला होता. पुरातून वाट काढत खाटेवरून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर पुंगाटी कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या भागात अजूनही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आदीवासी बांधवांनी रोष व्यक्त केला आहे. मृत्यूनंतरही प्रशासनाच्या मदतीच्या अभावी नरक यातना सहन करावी लागत आहे.