Death News: मरणानंतरही यातना संपेना! नाल्यात बुडालेल्या चिमुकल्याचा मृतदेह खाटेची कावड करुन नेला.....

Bhairav Diwase

गडचिरोली:- दुर्गम भामरागड तालुक्यातील कोयार येथील मृत चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाल्यातून कावड करून न्यावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भातील चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली होती. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग विकासापासून कोसोदूर असल्याने येथील आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहे.

दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे मृत्यूसत्र सुरुच असून पोळा सणासाठी आश्रमशाळेत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासह तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्टला समोर आली. दरम्यान, भामरागड व अहेरीमध्ये चार दिवसांत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे कोयार येथे बुडून मृत्युमुखी पडलेल्या बालकाला उत्तरीय तपासणीसाठी नेताना खाटेची कावड करुन नाला ओलांडावा लागला, त्यामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.


रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६, रा. कोयार ता. भामरागड) आणि टोका डोलू मज्जी (वय ३६, रा. हालेवाडा, ता. बैरमगड, जि. बिजापूर, छत्तीसगड, हमु. भटपार ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत.


रिशान हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होता. पोळा सणानिमित्त २१ ऑगस्ट रोजी वडिलांनी त्याला गावी आणले होते. काही वेळाने खेळायला बाहेर गेलेल्या रिशानचा बराच वेळ झाला तरी पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र तो आढळून आला नाही. अखेर २२ ऑगस्टल रोजी सकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शोधमोहीम हाती घेतली असता गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला.