मुल:- अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इसमाचा पाय घसरून उमा नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील उसराळा गावाजवळील उमा नदी पात्रात घडली. हरीशचंद्र जोगळू कोरडे (४०, रा. उसराळा) असे मृतकाचे नाव आहे.
उसराळा येथील मृतक दिवाकर देऊ म्हशाखेत्री यांच्या अंत्यसंस्कारासाठी हरीशचंद्र कोरडे हा गावकऱ्यांसोबत उमा नदीकडे गेला होता. नदी पात्रात उतरल्यानंतर चिखलात पाय घसरल्याने खोल डोहात बुडाला. आरडाओरड केल्यानंतर काही व्यक्ती धावून आले. मात्र, खोल पाण्यात वाहून गेला. पोलिसांना कळविल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. पण अंधार पडल्याने पोलिस पथक परत गेले.
शुक्रवारी (दि. ३) सकाळी पोलिस, नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेतला असता आठ वाजता हरिश्चंद्रचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला. या घटनेने उसराळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.