अहेरी:- अहेरी येथे पारंपरिक दसऱ्याच्या उत्सवात नागरिकांची गर्दी उसळलेली असतानाच मध्यरात्री अचानक झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाने खळबळ उडाली. राजमहाल परिसरातील गॅस फुगे विक्रेत्याच्या हायड्रोजन सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन दोन लहान मुलांसह तब्बल २० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या अहेरीच्या दसऱ्यावेळी जत्रेसदृश वातावरण असते. त्याचवेळी झालेल्या या स्फोटामुळे क्षणभर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की मुख्य चौकापर्यंत धडक बसल्यासारखा आवाज ऐकू गेला.
घटनेत गंभीर जखमी झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांसह इतरांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
या हलगर्जीला जबाबदार कोण?
अहेरीच्या दसऱ्यात झालेल्या फुग्याच्या सिलेंडर स्फोटानंतर एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. यात्रांमध्ये किंवा मोठ्या उत्सवांमध्ये फुगे विक्रेते आकर्षणासाठी हायड्रोजनने भरलेले फुगे विक्रीस आणतात. मात्र हे सिलिंडर बेकायदेशीरपणे वापरले जात असून त्यावर कोणतीही देखरेख किंवा परवानगी नसते. हायड्रोजन वायू अतिशय ज्वलनशील असल्याने अगदी छोट्या चुकीनेही मोठा स्फोट होऊ शकतो. अशा सिलेंडरचा वापर नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखाच आहे. प्रत्यक्षात नियमानुसार फुगे भरण्यासाठी हीलियम वायूचा वापर केला पाहिजे, कारण तो सुरक्षित आहे. पण खर्च टाळण्यासाठी विक्रेते स्वस्तात हायड्रोजन वापरण्याचा धोका पत्करतात. त्यामुळे यात्रेतील आनंदाचे वातावरण क्षणात भीषण दुर्घटनेत बदलण्याचा धोका राहतो. प्रशासन व पोलिसांनी कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे.