चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कोरपना तालुक्यातील कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्याच्या बाबतीतही तेच झाले आहे. प्रशांत मसे यांनी 6 एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. हंगाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पिकाची कापणी केली. मात्र, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले. ते उन्हात सुकविण्यासाठी शेतात ठेवले असता अवकाळी पावसाच्या तडाख्याने ते पुन्हा ओले झाले. थ्रेशर मशीनने सोयाबीन काढण्याचा प्रयत्न केला असता ओलसरपणामुळे थ्रेशर मालकाने काढण्यास नकार दिला.
परिणामी सोयाबीनच्या ढिगाऱ्यातच अंकुर फुटून पीक कुजण्यास सुरुवात झाली. अखेर हतबल झालेल्या मसे यांनी 6 एकरावरील जमलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लावून जाळून टाकले. या घटनेत सुमारे 25 हजार रुपये कापणी खर्च वाया गेला असून, संपूर्ण 6 एकरावरील उत्पादन नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रशांत मसे आर्थिक संकटात सापडले आहे.


