चंद्रपूर:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्याच्या नावाखाली बोगस पट्टे देण्यात आल्याचा गंभीर आणि तेवढाच धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय. हा सर्व प्रकार भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केल्याचा थेट आरोप आणि तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना चंद्रपुरातील राजकीय वातावरण यामुळे चांगलेच तापले आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोळा हजार पट्टे देणार असल्याचे जाहीर करून चंद्रपुरात काही ठिकाणी पट्ट्यांचे वितरण केले. त्यांनी प्रत्येक भाषणात स्वतःला पट्टेवाला मंत्री म्हणून संबोधले. गरीबांना पट्टे मिळणार याचा आनंद होता. तर या माध्यमातून मतांचे गणित जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न करताना तिकीट वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी पदावरून हटवण्यात आलेले माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी पट्टे वाटपातही लोकांची फसवणूक केल्याची तक्रार झाल्याने भाजप अडचणीत सापडली आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात पट्टे देण्यासंदर्भात महापालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. याच नोटीशीवर महापालिकेचा बनावट शिक्का मारून, त्याला लेमिनेट करून लाभार्थ्यांना वितरित करण्याचा प्रकार सुभाष कासनगोट्टूवार यांनी केल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेने चौकशी केली असता शिक्का आणि पट्टा बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गंभीर प्रकाराची तक्रार महापालिकेने पोलिसात केली. मात्र, हा प्रकार कुणी केला, याचा या तक्रारीत उल्लेख नाही. जेव्हा की तक्रारदाराने सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नावानिशी आणि पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यामुळे पालिका सुभाष कासनगोट्टूवार यांना वाचवत आहे, असा आरोप करीत तक्रारदाराने आंदोलनाचा इशारा दिलाय.

