Chandrap News: चंद्रपुरात राजकीय खळबळ: भाजप उमेदवाराने वाटलेले पट्टे ठरले बोगस; खासदार धानोरकरांनी गाठले महानगरपालिका कार्यालय!

Bhairav Diwase

चंद्रपूर-: "निवडणुकीच्या तोंडावर सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून गरिबांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींना जेलमध्ये पाठवा," अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. चंद्रपूरच्या राजू नगर परिसरात भाजप उमेदवार सुभाष कासनगोटूवार यांनी बनावट शिक्के असलेले 'बोगस पट्टे' वाटल्याचे महानगरपालिकेच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कासनगोटूवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक व चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त यांची भेट घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष कसनगोट्टूवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, प्रशांत भारती यांची उपस्थिती होती. 


या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेऊन तपासणी केली असता, संबंधित सर्व शिक्के आणि कागदपत्रे प्रशासकीय स्तरावर अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी (जावक क्र. ३५९, दि. १२/०१/२०२६) रामनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्रात हे शिक्के बनावट असल्याचे मान्य केले असून, हा प्रकार शासकीय कामकाजाच्या विश्वासार्हतेला बाधा पोहचवणारा असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या नगर रचना विभागामार्फत असे कोणतेही शिक्के तयार करण्यात आले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असून प्रशासनाने देखील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


सध्या शहरात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू असताना, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी सरकारी मोहोर आणि पदाचा गैरवापर करून बोगस पट्टे वाटणे हे आचारसंहितेचे थेट उल्लंघन आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहितेअंतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून, यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय यंत्रणेची बदनामी करणे असे गंभीर गुन्हे घडलेले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओ हे या गुन्ह्याचे सबळ पुरावे असून, राजकीय फायद्यासाठी जनतेची फसवणूक करणाऱ्या या प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले आहे.


या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सुभाष कासनगोटूवार आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग आणि फसवणुकीचा त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. सामान्य जनतेची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सहायक नगर रचनाकार श्री. प्रतिक देवतळे यांची नियुक्ती केली असून, पोलीस प्रशासनाकडे तक्रार देखील वर्ग करण्यात आली आहे.