Chandrapur News: चंद्रपुरात 'पट्टे' वाटपावरून रणकंदन; काँग्रेस-उबाठाचा आरोप निराधार, सुभाष कासनगोट्टूवारांचा पलटवार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव अटळ दिसू लागल्याने काँग्रेस आणि उबाठा कडून भाजपविरोधात खोट्या आरोपांचे राजकारण सुरू झाले आहे. खोट्या स्वाक्षरीचे पट्टे वाटप केल्याचा आरोप हा पूर्णतः निराधार, दिशाभूल करणारा आणि केवळ राजकीय सूडबुद्धीतून प्रेरित असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला आहे.

पट्टे वाटप करण्याचा अधिकार हा केवळ जिल्हाधिकाऱ्यांचा असून, भाजपने किंवा कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याने पट्टे वाटप केले असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांनी पट्ट्यासाठी सादर केलेल्या अर्जांची रिसिव्ह कॉपी नागरिकांना देण्यात आली आहे. ती पट्टा नसून अर्जाची पावती आहे, हे माहिती असूनही काँग्रेस आणि उबाठा जाणीवपूर्वक अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


लाडकी बहीण योजना विरोधात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने आता गरीब व गरजू नागरिकांच्या हक्कांच्या पट्ट्यांवरही राजकारण सुरू केले आहे. जनतेला विकासाऐवजी भीती आणि संभ्रम निर्माण करून मतदानावर परिणाम करण्याचा हा हतबल प्रयत्न असल्याची टीकाही कासनगोट्टूवार यांनी केली.


काँग्रेस नेमका कोणता कागद ‘पट्टा’ असल्याचे सांगत आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करताना भाजपची प्रतिमा मलिन करण्याच्या या कटाविरोधात मानहाणीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
भाजप विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असताना, काँग्रेस मात्र खोट्या आरोपांच्या आधारावर राजकीय अस्तित्व वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी केला.