Police Bharati: पोलीस भरती २०२४-२५: मैदानी चाचणीसाठी ११ फेब्रुवारीचा मुहूर्त!

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यभरातील पोलीस भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला आता वेग आला असून, प्रत्यक्ष मैदानी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही अटींनुसार या भरती प्रक्रियेला मान्यता दिली असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ पासून शारीरिक चाचणी प्रस्तावित करण्यात आली आहे.


महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या २०२४-२५ च्या भरती प्रक्रियेबाबत शासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेचे वातावरण असले, तरी भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन-सामुग्री खरेदी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून अनुमती दिली आहे.


भरतीसाठी हायटेक यंत्रणा: यावेळची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी CCTV यंत्रणा, RFID (Radio Frequency Identification) आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या अटी: महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतरच उमेदवारांची प्रत्यक्ष मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

प्रस्तावित तारीख: पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक चाचणी ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.