चंद्रपूर:- चंद्रपूर शहराच्या स्थानिक सत्तेचा महासंग्राम आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने आपली कंबर कसली असून, मतदानासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि EVM मशिनचे वाटप आज प्रभागनिहाय करण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण १७ प्रभागांमध्ये ही निवडणूक पार पडत आहे. यामध्ये एकूण ६६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १ ते १५ मध्ये प्रत्येकी ४ सदस्यांची निवड होईल, तर प्रभाग १६ आणि १७ मध्ये प्रत्येकी ३ सदस्यांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या निवडणुकीसाठी एकूण ३५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, यंदा महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी (R.O.) निहाय एकूण ५ पिंक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, जी आकर्षणाचे केंद्र ठरेल.
एकूण प्रभाग - १७
सदस्यांची संख्या - ६६
एकूण मतदार: २,९९,९९४
पुरुष मतदार: १,४९,६०९
महिला मतदार: १,५०,३५४
इतर: ३१
निवडणूक कर्मचारी: २,२०७
यंत्रणा: ७२० कंट्रोल युनिट आणि १५५० बॅलेट युनिट्सचा वापर.
महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने, या निवडणुकीत महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. उद्या सकाळी ७:३० वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. लोकशाहीच्या या उत्सवात आपले मत नोंदवून शहराच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केले आहे. शहरात राजकीय वातावरण तापले असतानाच, आता सर्वांच्या नजरा गुरुवारी होणाऱ्या मतदानाकडे लागल्या आहेत.

