गाव-खेड्यात धुरळा! जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक ५ फेब्रुवारीला; निकाल कधी लागणार?

Bhairav Diwase
मुंबई:- राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे राज्याती १२ जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.


राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार ज्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

१२ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी निवडणुका होतील.


मतदाराला दोन मते देता येणार

प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतील. १ मत जिल्हा परिषद आणि १ मत पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाइन प्रक्रिया राहणार असून महापालिका सारखीच होणार आहे. ज्या जागा राखीव आहेत. त्या जागेवर जातवैधता पडताळणी आवश्यक असणार आहे.


जातप्रमाणपत्र- उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्याची आवश्यकता असणार आहे. जातप्रमाणपत्र नसेल तर जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर ६ महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असणार आहे. जर नाही केलं, तर त्याची निवड रद्द होईल.


निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन - पत्र स्वीकारणे - १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६

छाननी - २२ जानेवारी २०२६

उमेदवारी माघारी अंतिम मुदत - २७ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवार यादी - निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर

मतदान - ५ फेब्रुवारी २०२६

मतमोजणी - ७ फेब्रुवारी २०२६ सकाळी १० पासून