जनतेचा निर्णय, विकासाची दिशा
मूल:- मूल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये जनतेच्या हितासाठी अपक्ष म्हणून उभे राहत असल्याची घोषणा सामाजिक कार्यात व पत्रकारितेत कार्यरत असलेले सतीश आकुलवार यांनी केली आहे. प्रभागातील रहिवाशांनी दिलेल्या आग्रहाला मान देत व त्यांच्या विश्वासाचा मान राखत ही दावेदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रभागातील सर्वांगीण विकास व जनतेच्या प्रश्नांचा प्रामाणिक आवाज बनणे हाच माझा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.
पत्रकारितेतून जनतेच्या प्रश्नांना वाचा
सतीश आकुलवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून स्थानिक समस्या, नागरिकांचे प्रश्न, प्रभागातील विकासकामांची गरज आणि प्रशासनाकडे दुर्लक्ष झालेल्या मुद्द्यांना सातत्याने उजेडात आणले. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची त्यांची शैली प्रभागामध्ये विशेष लोकप्रिय आहे.
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर
पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, गरजूंची मदत, शैक्षणिक-व सामाजिक वाटचालीत योगदान आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण मतदार व विविध वस्ती भागातील नागरिकांशी त्यांचे थेट व मजबूत नाते तयार झाले आहे.
“विकास हा एकमेव मुद्दा — जनतेचा विश्वास माझी ताकद”
प्रभागात मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, लाईट व्यवस्था, युवा व महिला उपक्रमांचे बळकटीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
“मला कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद नको, कारण माझ्यामागे आधीच प्रभागातील जनतेची ताकद ठामपणे उभी आहे. जनतेने दाखवलेला विश्वासच माझ्या विजयाची खरी गॅरंटी आहे,” असे सतीश आकुलवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
मतदारांमध्ये वाढता प्रतिसाद
प्रभागातील अनेक रहिवाशांमध्ये आकुलवार यांच्या दावेदारीबद्दल सकारात्मक वातावरण दिसत असून “निर्भीड आवाज व प्रामाणिक विकास” या भूमिकेमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यात सतत सक्रिय राहून त्यांनी प्रभागातील जनतेचा विश्वास आधीच जिंकला असल्याचे नागरिकांचे मत आहे.


