चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत आज भाजपात अक्षरशः अराजक माजलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म वाटप होत असतानाच गोंधळाचा स्फोट झाला. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपातच आज शिस्त धुळीस मिळाल्याचं चित्र दिसलं.
नागपूरमध्ये दोनदा बैठका घेऊन एक यादी अंतिम करून ती प्रदेशाकडे पाठविण्यात आली. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत यादी निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांच्याकडे पाठवली होती. परंतु प्रत्यक्ष एबी फॉर्म वाटपात निवडणूक निरीक्षक यांच्या हातून नियम पायदळी तुडवले गेले, असा उमेदवारांचा आरोप आहे.
वडगाव प्रभागात सत्यम गाणार, सोहम बुटले या एकाच प्रभागासाठी इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले. त्याचप्रमाणे एमईएल प्रभागात पूजा पोतराजे आणि चंद्रकला सोयाम या दोघींनाही एकाच जागेसाठी एबी फॉर्म वाटप झाले. तर विठ्ठल मंदिर प्रभागात विशाल निंबाळकर आणि भालचंद्र दानव या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ आणखी वाढला. निवडणूक निरीक्षक संचेती यांच्या या निर्णयांमुळे उमेदवारांत असंतोषाचा अक्षरशः ज्वालामुखी फुटला.
पक्षाने निश्चित केलेल्या यादीकडे दुर्लक्ष करून एका प्रभागात दोन-दोन उमेदवार उभे राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, तर इच्छुक उमेदवारांमध्ये रोष वाढला. निवडणूक निरीक्षक यांच्याकडून एकाच प्रभागातील झालेल्या या दुहेरी एबी फॉर्म - वाटपामुळे भाजपात अंतर्गत संघर्ष उफाळून आला, शिस्तबद्ध पक्षाची प्रतिमा डळमळीत होत असल्याची चर्चा चंद्रपुरात सुरू आहे.
पक्षात ऐक्य निर्माण करण्याऐवजी उमेदवारांमध्ये संघर्ष पेटवण्याचं काम संचेती यांनी केलं, असा सरळ आरोप भाजपातीलच अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे केला.चंद्रपूर मनपाच्या रणधुमाळीपूर्वीच भाजपातला हा अंतर्गत स्फोट पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेलाच मोठा धक्का देणारा ठरत आहे.

