Chandrapur News: "पालकमंत्री महोदय", संवेदनशील आहात का?; रोशन कुडेच्या भेटीविनाच पालकमंत्र्यांचा चंद्रपूर दौरा!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या रोशन कुडे किडनी प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला सावकारी पाशामुळे आपली किडनी विकावी लागली, ही धक्कादायक बाब समोर येऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी अद्यापही या कुटुंबाची भेट घेतली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


मिंथूर येथील तरुण शेतकरी रोशन कुडे याने १ लाख रुपयांच्या कर्जापायी ७४ लाखांच्या व्याजाचा डोंगर उभा राहिल्याने कंबोडियाला जाऊन आपली किडनी विकली. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. नुकतेच पालकमंत्री अशोक उईके हे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना या संदर्भात जाब विचारला असता, "चौकशी करून सांगतो," असे त्रोटक उत्तर देऊन त्यांनी बोलणे टाळले.
गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे, एसआयटी (SIT) तपास करत आहे, आरोपींना अटक होत आहे, मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना अजूनही या घटनेची पूर्ण माहिती नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे बच्चू कडूंसारखे नेते थेट रोशन कुडेच्या गावात जाऊन 'जनआक्रोश मोर्चा' काढत आहेत, तर दुसरीकडे जबाबदार पदावर असलेले पालकमंत्री मात्र मौन बाळगून आहेत. पालकमंत्र्यांचा हा 'थंडा प्रतिसाद' आगामी काळात त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो.