चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ एक भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोच्या माध्यमातून महायुतीने आपले मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.
या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांची एकत्रित उपस्थिती. गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीने हे दोन्ही दिग्गज नेते एकाच रथावर दिसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, 'चंद्रपुरात भाजप एकवटली' असल्याचा संदेश जनतेत गेला आहे.
या रोड शोमध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, आमदार बंटी भांगडीया आणि आमदार करण देवतळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. शहरातल्या अंचलेश्वर गेट, गांधी चौक, जटपुरा गेट आणि मुख्य बाजारपेठेतून निघाली.

