Pombhurna News: पोंभूर्णा तालुक्यात काँग्रेसने 'रणशिंग फुंकले'

Bhairav Diwase
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची वज्रमूठ!
पोंभूर्णा:- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित 'निवडणूक आढावा बैठक' मोठ्या उत्साहात पार पडली.


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, पोंभूर्णा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत देत काँग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.


बूथ सक्षमीकरणावर भर आणि रणनीती:

बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संतोषसिंह रावत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "येणारी निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून ती काँग्रेसच्या विचारांची आणि सामान्य जनतेच्या हक्कांची लढाई आहे." यावेळी प्रत्येक बूथवर संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देऊन एकजुटीने मैदानात उतरण्याचे आवाहन करण्यात आले. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


भाजपला धक्का; मंगेश उपरे यांचा काँग्रेस प्रवेश:

या बैठकीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला बसलेला मोठा राजकीय धक्का. भाजपचे तालुका अध्यक्ष (दलित आघाडी) तथा उमरी पोद्दारचे माजी सरपंच मंगेश उपरे यांनी जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. "काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून आणि सामान्य माणसाचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असून, आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने काम करू," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


विजयाचा निर्धार:

बैठकीच्या समारोपप्रसंगी पोंभूर्णा तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद जागा आणि चारही पंचायत समिती गणांवर काँग्रेसचा 'एकतर्फी विजय' होईल, असा ठाम विश्वास तालुकाध्यक्ष वासुदेव पाल व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


उपस्थित मान्यवर:

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव पाल, अशोक गेडाम, विलास मोगरकर, ओमेश्वर पद्मगिरीवार, प्रशांत उराडे, वैशाली बुरांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमरी पोद्दार येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.