मुंबई:- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यानी आज शिवसेना शिंदे यांच्या नेतृत्वात धनु्ष्य बाण हाती घेतला आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू हे एकेकाळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी वेगळी वाट निवडत प्रहार सामाजिक संघटनेतून राजकीय-सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत बच्चू कडू यांची घरवापसी झाली असल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी म्हटले की, निव्वळ आमदारकीसाठी नव्हे तर मुद्याच्या लढाईसाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. ही लढाई पदासाठी नसून लोकांच्या मुद्यांची लढाई आहे. या राज्यात ठिकठिकाणी कामगार-शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभी करू असा निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. आमचा झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा कायम राहणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले.


