चंद्रपूर:- पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या घवघवीत यशानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र, याच उत्साहाच्या वातावरणात चंद्रपुरात भाजपचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
देशभरातील भाजपच्या विजयानंतर चंद्रपूर शहरातही जल्लोषाचे वातावरण होते. मात्र, या जल्लोषामध्ये पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. एका बाजूला आ. किशोर जोरगेवार यांचा गट आणि दुसऱ्या बाजूला आ. सुधीर मुनगंटीवार यांचा गट आमनेसामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूरच्या राजकारणात दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. महानगरपालिकेच्या कारभारापासून ते विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये या वादाची प्रचिती येत आहे. आजच्या विजय जल्लोषातही हा अंतर्गत संघर्ष आणि शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.
दोन्ही गटांतील कार्यकर्ते घोषणाबाजी करत समोरासमोर आल्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. या घटनेमुळे चंद्रपूर भाजपमधील वाढती गटबाजी आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला यावर तातडीने तोडगा काढावा लागणार आहे.



