अपघात रोखण्यासाठी स्थानिक आणि महामार्ग पोलिसांची संयुक्त नाकाबंदी!
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार नागपूर परीक्षेत्रात रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी कंबर कसली आहे. महामार्ग पोलीस (प्रादेशिक विभाग नागपूर) चे पोलीस अधीक्षक मा. लोहीत मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण नागपूर परीक्षेत्रात'ऑपरेशन यु-टर्न' (Operation U-Turn) ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
गेल्या दोन वर्षांत अपघातांमध्ये ३२% घट!
महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या सखोल विश्लेषणावरून असे समोर आले आहे की, गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमा आणि ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) सुधारणांमुळे अपघातांच्या प्रमाणात तब्बल ३२ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. सन २०२६ मध्ये हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी पोलीस महासंचालकांनी कडक आदेश जारी केले आहेत.
'ऑपरेशन यु-टर्न' अंतर्गत ५ प्रमुख कलमांवर कारवाई:
१) ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध मोहीम: दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे.
२) हेल्मेट सक्ती: हेल्मेटविना दुचाकी चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
३) ओव्हरस्पीडिंगवर नियंत्रण: वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जात आहे.
४) धोकादायक पार्किंगवर कारवाई: रस्त्याच्या कडेला अनधिकृत आणि धोकादायक पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
५) एकात्मिक डॅशबोर्ड (Integrated Dashboard): रस्ते विकासाशी संबंधित सर्व यंत्रणा जसे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), MSRDC आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना एकाच डॅशबोर्डवर आणले जाईल. याद्वारे ब्लॅक स्पॉट्स, सुरक्षा त्रुटी, साईन बोर्ड, क्रॅश बॅरियर्स, प्रकाश व्यवस्था आणि सर्व्हिस रोड्सच्या सुधारणा कामांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांची संयुक्त नाकाबंदी!
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी जिल्ह्यातील अपघात क्षेत्रांचे बारकाईने निरीक्षण करून विशेष सुरक्षितता आराखडा तयार केला आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलीस चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी तीव्र नाकाबंदी करून कसूरदार वाहनचालकांवर दणक्यात कारवाई केली जात आहे.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
रस्ते सुरक्षित ठेवणे ही केवळ पोलिसांचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी केले आहे.
वाहनचालकांनी खालील नियमांचे काटेकोर पालन करावे:
दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरावे आणि चारचाकी किंवा जड वाहने चालवताना सीटबेल्ट अनिवार्यपणे लावावा.
ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स आणि गाडीची आवश्यक कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत किंवा डीजी लॉकर (DigiLocker) ॲपमध्ये अपलोड करून ठेवावीत.
वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे.
कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन वाहन चालवू नये आणि वेगमर्यादेचे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीत येथे संपर्क साधा (Helpline Numbers):
महामार्गावर कोणताही अपघात झाल्यास नागरिकांनी वेळेचा अपव्यय न करता खालील हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा:
तात्काळ रुग्णवाहिका सेवा: १०८ (टोल फ्री)
पोलीस हेल्पलाईन: ११२
जवळचा टोल नाका मदत सेवा: १०३३ (टोल फ्री)


