चंद्रपूर:- नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि नवीन कायद्यातील तरतुदींनुसार पारदर्शकता आणण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाकडून एक अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे. 'नवी आशा, नवा विश्वास' या संकल्पनेखाली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतील जप्त केलेला मौल्यवान मुद्देमाल मूळ फिर्यादींना सन्मानाने परत करण्याचा विशेष मुद्देमाल हस्तांतरण सोहळा १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.४० वाजता, पोलीस बहुउद्देशीय सभागृह, तुकूम, चंद्रपूर येथे संपन्न झाला.
काय-काय परत मिळालं?
नवीन कायद्यानुसार पारदर्शकतेने पार पडलेल्या या कार्यक्रमात चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, शेती अवजारे, दुचाकी व चारचाकी वाहने तसेच शोध लागलेले मिसिंग मोबाईल मूळ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आले. आपली चोरी गेलेली पुंजी आणि वस्तू परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संगिता राजेंद्र खांडेकर (महापौर, चंद्रपूर मनपा), प्रतिभा सुरेश धानोरकर (खासदार, चंद्रपूर-वणी-आर्णी), श्री. सुधीर मुनगंटीवार (आमदार, बल्लारपूर), किशोर जोरगेवार (आमदार, चंद्रपूर), सुधाकर अडबाले (आमदार, शिक्षक मतदारसंघ), वसुमना पंत (भा.प्र.से.) (जिल्हाधिकारी, चंद्रपूर), पुलकित सिंह (भा.प्र.से.) (सीईओ, जिल्हा परिषद, चंद्रपूर), अकुनुरी नरेश (भा.प्र.से.) (आयुक्त, चंद्रपूर मनपा) प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
हा संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे (म.पो.से.) आणि चंद्रपूर पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर स्वतःचा चोरी गेलेला मौल्यवान ऐवज पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणि 'नवा विश्वास' पाहायला मिळेल, यात शंका नाही!
