Chandrapur News : चंद्रपुरात राज्यातील पहिला २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. १ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत म्हाडा परिसरात हा आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव पार पडणार आहे. या महायज्ञाच्या युवा संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या भव्य आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, दिनांक २९ नोव्हेंबर सकाळी २०२६ वाजता आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते महायज्ञस्थळाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.


गायत्री शक्तिपीठ परिवाराच्या वतीने तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार यांच्या सहकार्याने या महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. महायज्ञाच्या माध्यमातून आध्यात्मिक जागृतीसोबतच व्यसनमुक्त भारताचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, चारित्र्यनिर्माण, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय गोसंवर्धन संमेलन, कृषी संमेलन, नारी सशक्तीकरण संमेलन, व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम तसेच विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व स्लोगन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असून, व्यसनांचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला जाणार आहे.

या महायज्ञाच्या माध्यमातून युवक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून सामाजिक प्रबोधनाचे मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची माहिती गायत्री शक्तिपीठ परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आध्यात्मिक ऊर्जा, सामाजिक प्रबोधन आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प घेऊन चंद्रपुरात आयोजित होणारा हा २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ राज्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.