Police Bharti : पोलीस भरतीः मासिक पाळी आल्यास चाचणीसाठी मुदतवाढ मिळणार

Bhairav Diwase
मुंबई:- महिला पोलीस भरतीसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान जर मासिक पाळी आली तर अशा उमेदवारांना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणींना दिलासा मिळाला आहे.


महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुणी या वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात. पहाटे उठून सराव करणे आणि मैदानी चाचणीसाठी स्वतःला झोकून देतात मात्र, ज्या खाकी वर्दीचे स्वप्न त्याने पाहिले होते, ती वर्दी मिळवण्यच्या दिवशीच जर मासिक पाळी आली तर सर्व वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते आणि भरतीची संधी वाया जात असते. परंतु आता तरुणींची या कारणामुळे संधी हुकणार नाही.


मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना हातापायात गोळे येणे, तीव्र पोटदुखी, चक्कर, अशक्तपणा याचा त्रास होत असतो. अशा वेळी 100 मीटर आणि 800 मीटर धावण्याची चाचणी, गोळाफेक तसेच लांबउडी सारख्या शारीरिक चाचणी परीक्षा देताना अडचणी येतात. यामुळे अनेक तरुणींमध्ये याची धास्ती असते. त्यामुळे त्यांना भरतीची संधी गमावण्याचे टेन्शन असते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन आता राज्य सरकारने पोलीस भरतीतील तरुणींच्या शारीरिक चाचणीच्या वेळी जर मासिक पाळी आली असेल तर त्यांच्या मैदानी चाचण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर घेण्यात येणार आहे.


सरकारच्या या निर्णयाचं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणींनी स्वागत केले आहे. तरुणींना मासिक पाळीमुळे चाचणीच्या दिवशी अपेक्षित कामगिरी करता येत नाही, त्यामुळे सरकारच्या या निर्णामुळे आता संधी हुकणार नाही, असे म्हणत निर्णय दिलासादायक असल्याची भावना व्यक्त केली आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेमुळे पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या मेहनतीवर अन्याय होऊ नये, यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, आरोग्य तपासणीचे निकष काय असणार आणि अधिकृत नियमावली कधी येणार, याकडे लक्ष आहे.