Top News

मुल: भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद.

चंद्रपूर जिल्ह्याचे देशात व राज्यात सर्वत्र कौतुक.
  Bhairav Diwase.    April 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
मुल: करोनामुळं झालेल्या लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी संवाद साधला. चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त राहिल्याबद्दल अभिनंदन करतानाच त्यांच्या प्रकृतीची मोदींनी आस्थेने चौकशी केली. दरम्यान, पंतप्रधानांचा असा अचानक फोन आल्याने मुल येथील त्यांच्या फडणवीस वाड्यावर सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.शुक्रवारी सकाळी ८.४३ वाजता मूल येथे फडणवीस वाड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन खणखणला. सकाळीच फोन खणखणल्याने कुणी आप्त स्वकीय किंवा कार्यकर्त्याचा फोन असावा असे शोभा फडणवीस यांना वाटले. मात्र, फोन उचलल्यानंतर बोलायला सुरूवात केली तर समोरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. विशेष म्हणजे सर्वप्रथम मोदींनी अतिशय आस्थेने शोभाताईंची चौकशी केली. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ताईंना तुम्ही कशा आहात, प्रकृती कशी आहे? अशी विचारणा केली.
सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे देशात व राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला मुख्य कारण चंद्रपूर जिल्हा करोनामुक्त आहे. तेव्हा कशा पध्दतीने चंद्रपूर करोनामुक्त राहिले याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी त्यांच्याकडून जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात करोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने अतिशय उत्तम कार्य केल्याची माहिती फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिली. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे कौतुक केल्याचे फडणवीस यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे सन १९८५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्रित काम केल्याची आठवण शोभा फडणवीस यांनी यावेळी सांगितली. त्यानंतरही आपण पंतप्रधानांसोबत काम केल्याची आठवण कथन करताना अनेक किस्से सांगितले. देशात व राज्यात सर्वत्र करोनाचे संकट आहे. करोना विषाणूच्या मुक्तीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून देशात लॉकडाउन लागू केला आहे. येत्या ३ मे पर्यंत हा लॉकडाउन कायम राहणार असून हा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचा सर्वत्र उद्रेक होत असताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व भंडारा हे चार जिल्हे करोनामुक्त झाले आहेत. येथे करोनाचा एकही रूग्ण अजूनही मिळालेला नाही. नागपूर व यवतमाळपासून या दोन्ही जिल्ह्यात करोनाचे रूग्ण मोठ्या संख्येत मिळाल्यानंतरही चंद्रपूर करोनामुक्त राहिल्याबद्दल विशेष कौतुक पंतप्रधानांनी केल्याचे शोभा फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने