फुलशेतीला टाळेबंदीचा फटका; लाखोंचे नुकसान.
Bhairav Diwase. April 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा: कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. याचा फटका शेतकर्यांनाही बसला आहे. बँकेचे कर्ज घेऊन दिवस-रात्र शेतात राबून नेमक्या उत्पादन निघण्याच्या वेळी कोरोना विषाणूचा प्रभाव वाढल्याने टाळेबंदीच्या पार्श्वभुमीवर शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील काही शेतकर्यांनी बँकेचे व बचतगटातून कर्ज काढून आपल्या शेतजमिनीत शेवंती शेतीची लागवड केली. अशातच वैश्विक महामारी असलेल्या कोरोनामुळे देशात टाळेबंदी करण्यात आली. सर्व दुकाने, बाजारपेठा, रहदारी, इतकेच नव्हे, तर धार्मिक स्थळेही बंद करण्यात आले. फुल मार्केट बंद असल्याने बाजारपेठ मिळणे कठीण झाले. फुले घेणारे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चेक आष्टा येथील राजेश्वर मरस्कोले व अर्जुन मरस्कोले व या परिसरातील अनेक शेतकरी फुलशेती करतात. यावर्षी फुलशेतीचे उत्पादन चांगले झाले होते. शिवाय फुलशेतीही बहरली होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे फुल मार्केट बंद करण्यात आले. बाजारपेठ पूर्णत: ठप्प असल्याने या शेतकर्यांच्या फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुणीही खरीददार यांच्याकडे भिरकला नाही. त्यामुळे शेतातील शेवंतीची फुले तोडणी न झाल्यामुळे शेतातच सुकून जात आहेत.
कर्ज घेऊन शेती केल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची, हा यक्षप्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. शेतकर्यांनी आपली आर्थिक घडी बसविण्यासाठी व आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी फुलशेतीची लागवड केली. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता टाळेबंदी असल्याने फुलांची विक्री थांबली आहे. ही फुलशेती करण्यासाठी केलेला खर्च जास्त असून, उत्पन्न मात्र अजूनपर्यंत काहीच निघालेला नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी या शेतकर्यांतून करण्यात येत आहे.