मोखाळा व भट्टीजांब येथील नालीचे काम निकृष्ट - मोखाळ्याचे उपसारपंचाने काम केले बंद.

Bhairav Diwase
मोखाळा व भट्टीजांब येथील बंदिस्त नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाली असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. तर मोखाळा येथील उपसरपंच संदीप जुनघरे यांनी निकृष्ट कामच पाडले बंद.
Bhairav Diwase.    July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- मोखाळा व भट्टीजांब येथील बंदिस्त नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाली असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. तर मोखाळा येथील उपसरपंच संदीप जुनघरे यांनी निकृष्ट कामच बंद पाडले आहे.
       प्रधानमंत्री खनिज विकास निधींअंतर्गत भट्टीजांब येथे क्रांक्रीट रोड व बंदीस्त नालीचे बांधकाम झाले. रोडच्या कामात 20मिमी गिट्टीचा वापर करण्याऐवजी 40 मिमी गिट्टीचा वापर केल्या जात असल्याने गावकऱ्यांनी संबंधित अभियंत्याकडे तक्रार केली. त्यानंतर रोडच्या कामात सुधारणा करण्यात आली. त्याच ठिकाणी बंदीस्त नालीचे बांधकाम करण्यात आले. नालीवर सेंटरिंग लावून फरशी टाकायला पाहिजे परंतु बाजूला फरशी बनवून लावण्यात येत आहे. फरशी इतकी निकृष्ट दर्जाची आहे की केवळ रेती दिसते व ते दिसू नये यासाठी सिमेंटपाणी दिल्या जात आहे. याच पद्धतीचे काम मोखाळा येथे सुरू असल्याने येथील उपसरपंच संदीप जुनघरे यांनी कामच बंद पाडले.
 विशेष म्हणजे दोन्ही कामे पुल्लूरवार या ठेकेदारकडे असून  कामाची जबाबदारी कनिष्ट अभियंता गायकवाड यांचेकडे आहे. मागे चकविरखल येथे शाळेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करण्यात आल्यावर दुरुस्ती करण्यात आली होती तेसुद्धा काम याच ठेकेदार व अभियंता  कडे होती. सदर ठेकेदारकडे जे जे कामे आहेत ती बहुतेक कामे गायकवाड या अभियंत्याकडे असल्याने दोघांचे चांगले साटेलोटे आहेत त्यामुळे बिलेही निघण्यास अडचणी येत नसल्याची तालुक्यात चर्चा आहे.  संबंधित कंत्राटदाराला राजकीय पाठबळ असल्याने कोण काय करतोय या गुर्मीत काम करतो तर संबंधित जिल्हा परिषद उपविभाग मूलचे अभियंते आर्थिक व्यवहार करून बिले पास करतात. त्यामुळे सदर ठेकेदारकडे तालुक्यात असलेली सर्व कामाची चौकशी व्हावी अशी मागणी तालुक्यात होत आहे.