आमदार सुभाष धोटे ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली थेट तक्रार.

Bhairav Diwase
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांची कार्यप्रणालीची केली तक्रार.
Bhairav Diwase. July 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे ह्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या पहिल्याच व्हिडिओ कॉन्फरन्स मधे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोविड 19 च्या संकटामुळे मंत्री, मुख्यमंत्री तसेच आमदार ह्यांच्यात कुठलीही बैठक होणे शक्य नसल्याने आणि राज्याचा गाडा सुरळीत रेटण्यासाठी जनतेच्या समस्या जाणुन घेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री, मंत्री तसेच सत्ताधारी आघाडीतील आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्यात आली.

ह्या बैठकीत कॉंग्रेस पक्षाचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे ह्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी स्पष्टपणे जाहिर केली असुन महा आघाडी सरकारचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची कामे होत नसल्याची तक्रार करतानाच सत्ताधारी असुनही जर कामे होणार नसतील तर जनतेला काय उत्तर देणार असा थेट प्रश्न उपस्थित केल्याची माहिती मिळाली आहे.

प्रत्येक आमदारांवर कार्यकर्ता तसेच जनतेचा समस्या सोडविण्यासाठी दाबाव असतो आणि जर ह्या समस्या मार्गी लागत नसतील तर सत्तेत असुन काय उपयोग अशी भावना निर्माण होते. त्याच अनुषंगाने आमदार सुभाष धोटे ह्यांनी युती शासन काळात तसेच महाआघाडी शासन काळात कॉंग्रेस आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात निधी मिळण्यास तसेच विकासकामांच्या बाबतीत होणार्‍या दुर्लक्षाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील 2 नगरपालिका कॉँग्रेस पक्षाच्या ताब्यात असुन अनेक महिन्यांपासुन नगरविकास खात्याकडे महत्त्वाच्या फाईल धूळखात पडून असुन जानेवारी दरम्यान पाठविलेल्या महत्वाच्या प्रस्तावांवर अजुनही निर्णय होत नसल्याने नाराज असलेल्या आमदार धोटे ह्यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ह्यांची तक्रार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.