भाजपाच्या प्रयत्नांना यश.
Bhairav Diwase. Aug 12, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना नियमित वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने डॉ. सुरपाम प्रभारी अधिष्ठाता यांची दिनांक 6 ऑगस्ट रोजी भेट घेत निवेदन सादर केले होते. यावेळी दोन महिन्यांचे वेतन त्वरीत प्रदान करण्यात येईल असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. सुरपाम यांनी डॉ. गुलवाडे आणि शिष्टमंडळाला दिले होते. भाजपाच्या शिष्टमंडळाने केलेल्या पाठपुरावाला यश मिळाले असून कंत्राटी कर्मचा-यांचे दोन महिन्यांचे वेतन प्रदान करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे जवळपास 501 कंत्राटी कामगार गेल्या 8 ते 9 वर्षापासून कार्यरत आहे. परंतु सदर कर्मचा-यांचे मासिक वेतन नियमित होत नसून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नाही तसेच त्यांची पी.एफ. ची रक्कम सुध्दा त्यांच्या वेतनातुन कपात होत नाही. बहुतांश कामगार गरीब व मध्यमवर्गीय असून वेतनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची आल्याची बाब डॉ. मंगेश गुलवाडे यांनी अधिष्ठाता सुरपाम यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान निदर्शनास आणली होती. डॉ. सुरपाम यांनी दोन महिन्यांचे वेतन त्वरीत प्रदान करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार सदर आश्वासनाची पूर्तता झाली आहे. भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी अधिष्ठाता डॉ. सुरपाम यांचे आभार व्यक्त केले आहे.