Top News

नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करा अन्यथा शक्य नसल्यास ठार करा; विरुर (स्टे.) वनपरिक्षेत्रातील शेतकरी व शेतमजुरांची मागणी.

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे शर्थीचे निर्देश केले असून लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल- एन आर प्रवीण मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
Bhairav Diwase. Aug 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. मागील 5,6 महिन्यापासून या परिसरात छट्टेदार वाघाने धुमाकूळ माजवली आहे. त्यामुळे या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याबाबत मा. संजय राठोड साहेब , मंत्री, वने महाराष्ट्र राज्य याना निवेदन सादर करण्यात आले.
आता पर्यंत या परिसरात वाघाने 8 शेतकरी, शेतमजूर ठार केले असून त्याची पाळीव जाणारे सुद्धा फस्त केली आहे. शेत शिवारात दिवसाढवळ्या हा वाघ वावरत असल्यामुळे शेतीची कामे करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतात उभे पीक असून त्यांचे संगोपन, संरक्षण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यात शेतात जाण्यास भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेती हे उपजीविकेचे साधन असल्यामुळे उपासमारीची वेळ परिसरातील शेतकऱ्यावर येण्याचे नाकारता येणार नाही आहे. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. शासनाकडून जी काही मदत मिळणार असली तरी ती मदत आयुष्यभर त्यांना पुरेल अशी शक्यता नाही. नुकताच शेतकऱ्याचा सण असलेल्या पोळीच्या दिवशी वाघाने केलेल्या हल्ल्यात नवेगाव येथील कोंडेकर नामक शेतकरी जागीच ठार झाला.
या संबंधाने वनविभाने वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु वनविभागला अपयश येत आहे. तसेच मा. सुदर्शन निमकर माझी आमदार राजुरा यानी नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची किंवा ठार मारण्याची मागणी यापूर्वी केली होती. मात्र या गंभीर समस्येकडे वनविभागाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला अपयश आल्यास या वाघाला ठार मारण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदनात स्पष्ट कळविण्यात आले आहे.
या निवेदनामार्फत प्रत्येक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येक कुटुंब याप्रमाणे 25 लाख रुपये शासनाकडून मदतीची मागणी करण्यात आली. तसेच कुटुंबातील पात्रता धारक सदस्य असल्यास त्याला शासकीय सेवेत नोकरी वर घेण्याची मागणी करण्यात आली. हल्ल्यात जखमी व्यक्तीचा उपचारावरील संपूर्ण खर्च वनविभाने शासनातर्फे करावा अशी मागणी करण्यात आली.
   जर वनविभाने या समस्येला गंभीर्याने घेतले नाही किंवा वनविभागाने अपयश दाखविला तर नाइलाजास्तव राजुरा तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने दि ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते४ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी वनविभाची असेल. असा निवेदनातून स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. तसेच विजय वडडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर, बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर, सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्य, सुभाष धोटे आमदार राजुरा, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार राजुरा, वामनराव चटप माजी आमदार राजुरा, सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा यांनाही प्रतिलिपीत निवेदन देण्यात आले.
   यावेळी नत्थुजी बोबाटे, शांताराम बोबाटे, माधव बोबाटे, सुशील धोटे, विश्वेश्वर जीवतोडे, शंकर सोयाम, प्रभाकर कडुकर, राजू बोबाटे, शंकर धनवलकर, पुरोगामी पत्रकार संघ राजुरा तालुका संघटक आनंदराव देठे, सचिन डोहे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो चंद्रपूर, मोहन कलेगुरवार जिल्हाध्यक्ष भाजयुमो वि.आ चंद्रपूर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने