संतोषकुमार वरपल्लीवार नवेगाव भु. तह. मूल येथील रहिवासी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- महाराष्ट्रात दर वर्षी प्रत्येक जिल्हा परिषद मार्फतीने ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात येतो. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातून एका कर्तबगार प्राथमिक शिक्षकाला जिल्हा पुरस्कार देण्यात येतो.
या वर्षीचा हा जिल्हा पुरस्कार जि.प. उच्च प्राथ. शाळा, पारडी. तह. सावली येथील विषय शिक्षक संतोष वरपल्लीवार यांना बहाल करण्यात आला. नवेगाव भु. तह. मूल येथील रहिवासी संतोष वरपल्लीवार हे प्राथ. शिक्षक असुन त्यांचं शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदान कौतुक करण्यासारखं आहे. आपल्या सेवा काळात त्यांनी लोकसहभागातून लाखो रुपये शाळेसाठी उभे केले. मुलांसाठी भौतिक सुविधा लोकवर्गणीतून पूर्ण केल्या. प्रत्येक गोष्टीसाठी शासनावर विसंबून न राहता आपणही पुढाकार घ्यावा यासाठी गावकऱ्यांना एकत्रित केले. सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे हा सरांमधला सर्वात महत्त्वाचा गुण. विद्यार्थीप्रिय असलेले संतोष सर स्वतः कलागुणांनी परिपूर्ण आहेत. दिव्यांग मुलासाठी तयार झालेल्या दिव्यांग या मराठी चित्रपटात त्यांनी गितकार, संगीतकार, गायक व कलावंत म्हणून कामगिरी बजावली. याच चित्रपटाला चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके या सर्वोतकृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. याच चित्रपटातील संगीताला तेलंगाना राज्य सरकारने संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार बहाल केला. सरांनी केलेल्या प्रबोधन कार्याला अखिल भारतीय दलीत साहित्य अकादमी नवी दिल्ली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशीप अवॉर्ड* ने सन्मानीत केले. सर स्वतः कलावंत, लेखक, कवी असून त्यांनी कित्येक नाटकांचे, चित्रपट पटकथांचे, भावगीतांचे लेखन केले आहे. स्वतः २००० च्या वर नाट्य प्रयोग केलेले आहे. संतोषकुमार सरांचे आज पर्यंत १० च्या वर विविध नामवंत कॅसेट कंपनीनं काढलेले ऑडियो अल्बम महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले संतोषकुमार वरपल्लीवार सरांना जिल्हा परिषद चंद्रपूर ने जिल्हा पुरस्काराने सन्मानित करून खऱ्या अर्थाने कलेचा सन्मान केलेला आहे. यामुळे मूल, सावली परिसरातून संतोषकुमार सरांचे अभिनंदन व पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.