गावखेड्यात कोरोना बाबत पसरत आहे अफवा.
अफवा वर विश्वास ठेवु नका, आरोग्य विभागाला च्या पथकाला सहकार्य करा:- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
भद्रावती:- माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले. तसेच गावातील कोणालाही काहीही झाले नसून तुम्हाला फुकटचे दीड लाख रुपये मिळतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला. तालुक्यातील मानोरा गावात हा प्रकार घडला आहे.
देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रतिबंधासाठी शासन, प्रशासनाकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोना योद्ध्ये जिवाची पर्वा न करता अविरत सेवा देत आहेत.
मागील काही महिन्यांपासून कोरोना आजाराबाबत गावखेड्यांत वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले आहे. कोरोना रुग्णांची किडनी काढली जाते, प्रत्येक कोरोना रुग्णाला दीड लाखांचे अनुदान मिळते, अशा एक ना अनेक चर्चा गावखेड्यात ऐकायला मिळत आहेत.
यातूनच नागरिकांमध्ये कोरोना आजारासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात सध्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राबविले जात आहे. या अभियानाची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. तपासणीसाठी आरोग्य पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे प्रत्येक गावातील कुटुंबांची माहिती जाणून घेतली जात आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा गावात आशावर्कर, अंगणवाडीसेविकांचे आरोग्य पथक तपासणीसाठी गेले. तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला काहीच झाले नाही, आमची तपासणी करू नका, असे म्हणून गावातून हाकलून लावले.
दरम्यान, आरोग्य पथकाने याबाबतची माहिती तहसीलदार महेश शितोळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय असुटकर यांना दिली. तहसीलदार शितोळे हे आरोग्य पथकासह शनिवारी मानोरा गावात नागरिकांची समजूत घालण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मनातील अफवा दूर करीत तपासणीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. परंतु, काही वेळातच संपूर्ण गावकरी हातात काठ्या घेऊन एकत्र आले. गावात कोरोना लक्षणाची तपासणी करू नका. गावकऱ्यांना काहीच झाले नाही. आमची काळजी आम्ही घेऊ. तुम्हाला फुकटचे दीड लाख रुपये मिळतात, असे म्हणत आरोग्य पथकाला मज्जाव केला. गावकऱ्यांचा संताप बघता आरोग्य पथकाने गावातून काढता पाय घेतला, असे भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले.
अफवा वर विश्वास ठेवु नका आरोग्य विभागाला च्या पथकाला सहकार्य करा:- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आव्हान केले आहे