अखेर नरभक्षी वाघ जेरबंद, तब्बल नऊ महिन्यानंतर प्रशासनाला यश.

Bhairav Diwase
नरभक्षी वाघाने दोन वर्षात घेतले दहा शेतकरी, शेतमजुरांचे बळी.
Bhairav Diwase. Oct 27, 2020
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा आणि विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यास आज (दि. 27 ऑक्टोबर) वन विभागात यश आले. मागील दोन वर्षात दहा शेतकरी व शेतमजुरांचे बळी वाघाने घेतले होते. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत होती. शेतकरी अतिशय आक्रमक झाले होते. अखेर आज दुपारच्या सुमारास राजुरा तालुक्यातील सिंधी गावालगतच्या जंगलामध्ये पिंजर्‍यात वाघ अडकला असल्याची माहिती समोर आलेली आहे.

ही मोहीम वनविभागाने अतिशय गुप्तपणे राबवलेली होती . वाघ पकडल्याच्या माहितीस चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांनी सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला.

नरभक्षी वाघ पिंजऱ्यामध्ये सापडलेला आहे. त्याला बेशुद्ध करून पुढे नेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वन विभागामार्फत करण्यात येत आहे. या मोहिमेबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली आहे.

आतापर्यंत या वाघाने दहा शेतकरी शेतमजुरांचा जीव घेतला. शेतकऱ्यांचा आक्रोश अनावर झाल्याने शेतकरी व शेतमजूर समन्वय समितीच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने विरूर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गतिमान केली.

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने धुमाकूळ घातल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवन दहशतीत होते. परिसरातील बावीस गावांमधील शेतकऱ्यांना शेतावर जाणे कठीण झाले होते. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतावर जाऊ शकत नव्हते. एकीकडे नैसर्गिक प्रकोपात उध्वस्त झालेली शेती तर दुसरीकडे नरभक्षी वाघाची असलेली दहशत यामध्ये शेतकरी सापडलेला होता.

मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार आणि उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल यांनी मोहिमेला गती दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांचा कडा पहारा या मोहिमेवर होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली वाघाला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. या मोहिमेबाबत 'सकाळ'ने सातत्याने वृत्तलेखन केले आहे. अखेर आज दिनांक 27 ऑक्टोबरला वनविभागाला नरभक्षी वाघ जेरबंद करण्यास यश आल्याची माहिती आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. वनविभागाकडून कायदेशीर पुढील कार्यवाही सुरू आहे.