भाजपा नगरसेविकेने का घेतला रुद्रावतार?

Bhairav Diwase

वैरागडे-बेले यामधील नेमका वाद काय?
Bhairav Diwase. Nov 23, 2020
चंद्रपुर:- चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय तक्रारींच्या निमित्ताने कायम वादात राहणारे राजेश बेले यांच्या घरी जावून भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी गोंधळ घालत तोडफोड केली. भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपल्या कुटुंबासह बेले यांचे घर गाठत तोडफोड करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे जटपुरा गेट परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा:- वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन मुलं बुडाले.

गेले काही दिवस आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्याविरोधात अनाधिकृत बांधकाम केल्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या होत्या. त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता. त्याचं पर्यवसन शनिवारी थेट हल्ला व तोडफोडीत झालं. दरम्यान सततची बदनामी व अधिकाऱ्यांकडे होत असलेली वेगवेगळ्या कामांची नाहक तक्रार यामुळेच संतापून जात आपण हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी म्हटलं आहे. आरटीआय कार्यकर्ते बेले यांनी याच प्रकारातून आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची बाबही वैरागडे यांनी बोलून दाखविली.

हेही वाचा:- गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.

दुसरीकडे, भाजप नगरसेविका छबुताई वैरागडे यांनी आपण स्वतः कोरोना काळात विलगीकरणात असताना मुद्दाम घराचे बांधकाम तोडत नाहक वाद उकरून काढल्याचे राजेश बेले यांनी सांगितलं आहे. तर विविध अनाधिकृत व बेकायदा प्रकरणात आपण आवाज उचलल्याने वैरागडे यांनी संतप्त होत आपल्यावर कुटुंबियांसह चाकू हल्ला केला, असा आरोप देखील बेले यांनी केला आहे. दरम्यान दोन्ही पक्षांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत परस्परांविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.

हेही वाचा:- तुला तुझ्यावर खरे प्रेम करणारे जीव लावणारे तरी कळतात का? 

दरम्यान, गेले काही महिने चंद्रपुरात आरटीआय व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकरणांमध्ये सातत्याने विरोधी भूमिका घेतल्याने संघर्षाची स्थिती उद्भवली आहे. आता रामनगर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे.