आदर्श घाटकुळ ग्रामपंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार.

५० लाखांचे पारितोषिक; जिल्हा व राज्यात गाव ठरतोय प्रेरणादायी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
घाटकुळ:- पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावाने राज्यात आदर्श ग्राम पुरस्कार पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला. नुकतेच घाटकुळ ग्रामपंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम घोषित करण्यात आले असून इतर गावांनी प्रेरणा घ्यावी असे नाविण्यपूर्ण उपक्रम व विकासकामाने जिल्हा व राज्यात गाव दिशादर्शक व प्रेरणादायी ठरले आहे. तालुकास्तरावरील १० लाख व जिल्हा स्तरावरील ४० लाख असे एकुण ५० लाखांचा जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार घाटकुळ ग्रामपंचायतीला शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून प्रदान करण्यात येणार आहे.

                  लोकसहभाग व श्रमदानातून गावक-यांनी केलेली कामे, ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना, गावहितासाठी राबवलेले कल्याणकारी उपक्रम व त्यातून घडलेल्या परिवर्तनामुळे गाव राज्यात आदर्श ग्राम, हरित व स्वच्छ ग्राम, जिल्हा स्मार्ट ग्राम ठरले. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात घाटकुळने राज्यात ओळख निर्माण करुन नावलौकीक मिळवले. गावात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शता या स्मार्ट ग्राम निकषानुसार विकास कामे झाली असून गाव सर्व सोयी सुविधा युक्त आहे. 

                      राज्यात आदर्श व 'माॅडेल व्हिलेज' म्हणून गावाने भरारी घेतली आहे. गावात प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असून गाव हागणदारीमुक्त व निर्मल आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदीस्त गटारे व घनकचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र व्यवस्था आहे. गावातील शाळा, अंगणवाडी आयएसओ नामांकित आहे. थेट आयएसओ नामांकित ग्रामपंचायतीचे लोकार्पन झालेली घाटकुळ राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. गावाचे स्वतंत्र संकेतस्थळ, ॲप, फेसबुक पेज आदी अद्ययावत माध्यमे आहेत‌. वृक्षलागवड व संगोपण, अद्ययावत आज्ञावली, शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज व्यायामशाळा, वाचनालय व अभ्यासिका तसेच सार्वजनिक उद्यान आहे. गावात प्रभावी दारूबंदी आहे. गावात दारु विक्री करणा-यावर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई ग्रामसभा करते. ग्रामसभा सक्षमीकरणामुळे शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी तसेच बचत गटातून महिला सक्षमीकरण झाल्याने महिलांनी राज्यात भरारी घेतली. ग्रामसंवाद व हितगुज प्रकल्प या नाविण्यपुर्ण उपक्रमाने मोठ्या प्रमाणात जनजागृती घडून आली. महिलांनी धान खरेदी विक्री उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन, कापड व्यवसाय, मत्सपालन, कुंभार काम आदी व्यवसायातून आर्थिक समृद्धी साधली. गावातील निर्मल महिला बचत गट, युवा जनहित संस्था व मराठा युवक मंडळाचे युवक, महिला ग्रामविकासासाठी एकवटले आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील विविध गावातील ग्रामपंचायतीचे आदर्श गाव अभ्यास दौरे घाटकुळ गावात होत असून गावक-यात उत्साह निर्माण झाला आहे. 

             गावकऱ्यांनी मनावर घेतले तर गाव नक्की पुढे जातो हे गावाने सिद्ध केले. उज्वला योजनेमुळे गाव धूरमुक्त आहे. स्वच्छता हा गावाचा नियमित उपक्रम आहे. गावातील विरोधी पक्षनेतेंच्या हातात स्वच्छतेचा झाडू असतो, हे विशेष. माहीती व जनसंपर्क विभागातर्फे घाटकुळ हे जिल्ह्यातील पहिलेच 'लोकराज्य ग्राम' ठरले. गावात जशी ग्रामपंचायत आहे तशी ६ ते १६ वयोगटातील बालकांची 'बालपंचायत' येथे कार्यरत असून राज्यात सर्वोत्कृष्ठ काम करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलप्राप्त ठरली आहे.
राज्य व केंद्रशासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सौर उर्जा, बायोगॅस, एलईडी बल्बचा वापर नियमीत होत असून गावात चौकाचौकात सिसिटीव्ही कॅमेरे आहे. पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाचे विशेष सहकार्याने गावाची वाटचाल सकारात्मक होत असून गावाला पद्मश्री पोपटराव पवार, माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, डॉ.कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांनी भेटी देवून गावक-यांना मार्गदर्शन केले. गावाच्या विकासासाठी गटविकास अधिकारी धनंजय साळवे, पं.स.सदस्य विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनात ग्रामसेवक ममता बक्षी, विशेष योगदान देणारे ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, माजी सरपंच प्रिती मेदाळे, गंगाधर गद्देकार, पत्रू पाल, अरुण मडावी, कुसुम देशमुख, प्रज्ञा देठे, रजनी हासे, सुनिता वाकुडकर, कल्पना शिंदे, आकाश देठे, वामन कुद्रपवार, अनिल हासे, उत्तम देशमुख, राम चौधरी, मुकुंदा हासे, विठ्ठल धंदरे, ॲड.किरण पाल, चंद्रशेखर बोरकुटे, अशोक मेदाळे, योगेश देशमुख, विठ्ठल धंदरे, स्वप्निल बुटले, चांगदेव राळेगावकर, देविदास धंदरे, शुभम गुडी, संदिप शिंदे, दिलीप कस्तुरे, प्रविण राऊत, निखिल देशमुख, राहूल हासे, शैलेश शिंदे, अमोल झाडे, प्रतिमा दुधे, मालन पाल, विजया पातर, कल्पना पाल, प्रियदर्शनी दुधे, भाग्यश्री देठे, मंदा पेरकर, उर्मीला खोब्रागडे, छाया हासे, मनिषा गोडबोले, भारती हासे, ज्ञानेश्वर चौधरी, रुपेश राऊत, संदिप सुंबटकर, शुभम दयालवार तसेच अंगणवाडीसेविका, शिक्षकवृंद, कर्मचारी व गावक-यांनी परिश्रम घेतले.

श्रमदान व लोकसहभागाने गावाचा कायापालट.
=============================

घाटकुळ येथील जनहित व मराठा युवक मंडळांनी श्रमदानातून चौक सौदर्यीकरण केले. बचत गट महिलांनी नालीचा स्वेच्छेने उपसा केला. गावकरी एकत्र येत गावातील विहीरींचा गाळ उपसा तसेच वनराई बंधारे बांधले. जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा बांधला. ग्रंथालयासाठी लोकवर्गणीतून पुस्तके व साहित्याची व्यवस्था केली. कुंभार समाजाने आकर्षक मडक्याच्या कलाकृतीचा तर भोई समाजाने पारंपारिक मच्छीजाळांचा स्वागत गेट बनवला. क्रिडांगण व मुख्य चौकात श्रमदानातून मुरुम पसरवला. अभ्यास गट, ग्रामसभा सक्षमीकरणातून निर्णयप्रकीया व गावहितासाठी नियोजनात्मक भुमीका घेवून गावाचा कायापालट केला. यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाने गावाला दिशा दिली. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने