Top News

नव्या कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार "त्या" बछड्यांची डरकाळी.

Bhairav Diwase. Dec 11, 2020
गोंडपिपरी:- वाघांसाठी नंदनवन ठरणाऱ्या कन्हाळगाव अभयारण्यात आता नव्याने भर पडणार आहे. डोंगरगाव-सुकवाशीत आढळून येणाऱ्या "त्या" चार बछडयांची डरकाळी येत्या काही दिवसात कन्हाळगाव अभयारण्यात गुंजणार आहे. विशेष म्हणजे, अभयारण्याचा क्षेत्रात दहापेक्षा अधिक वाघांचा आधीच वावर आहे. आंतरराज्यीय पर्यटनाला वाव असलेल्या कन्हाळगाव अभयारण्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मध्य चांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव-सूकवाशी परिसरात वाघिणीसह चार बछडयांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.

         परिसरातील शेतकऱ्यांना, गुराख्यांना वाघिणीसह बछडयांचे दर्शन अनेकदा झाले आहे. वनविभागानेही याला दुजोरा दिला आहे. बाल्यावस्थेत असलेले हे चारही बछडे येत्या काही दिवसात मुक्तसंचार करणार आहेत.


        कन्हाळगाव अभयारण्यात धाबा परिसरातील बहुतांश वनक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या चारही वाघांची डरकाळी अभयारण्यात भविष्यात गुंजणार आहे. वाघांच्या बछडयांवर वनविभागाची नजर असून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभाग दक्ष आहे. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

आंतरराज्यीय पर्यटनाला वाव:-
बहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने आंतरराज्यीय पर्यटनाला मोठा वाव आहे. गोंडपिपरी तालुक्याला त्याचा लाभ होणार आहे.

दहा वाघ, २३ बिबट्यांची नोंद:-
नव्यानेच जाहीर झालेल्या कन्हाळगाव अभयारण्यातील वाघाच्या आकडेवारीबाबत मतभिन्नता आहे. दहा वाघ, २३ बिबटयांचा आवास अभयारण्यातील वनक्षेत्रात असल्याची रितसर नोंद वनविभागाकडे आहे. मात्र यापेक्षा अधिक वाघ, बिबट वनक्षेत्रात असल्याचे बोलले जात आहे. या आकडेवारीत आता नव्याने भर पडणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने