असा असणार निवडणूक कार्यक्रम; आचारसंहिता लागू.
वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
गावपातळीवरील पुढाऱ्यांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले. दरम्यान, ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.
राजकीय हालचालींना वेग:-
आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यापूर्वीच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती. पण आता सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार असल्याने आणि २३ डिसेंबर २०२० पासूनच नामांकन दाखल करण्यास सुरूवात होणार असल्याने येत्या दोन चार दिवसांत गावपातळीवरील राजकीय हालचाली चांगल्याच गती घेतील, असे संकेत आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम:-
निवडणूक कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारवारांना चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.
आचारसंहिता लागू:-
जिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांवर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींमध्ये ११ डिसेंबर २०२० पासून आचारसंहिता अंमलात आणण्यात आलेली आहे.
संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन होईल दाखल:-
या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. नामनिर्देशन पत्र २३ ते ३० डिसेंबर २०२० (२५, २६ व २७ डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळून) या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
निवडणुकीचे जाहीर झालेले पत्र:- https://drive.google.com/file/d/1-VVfzbaNYR85x7o1l2Lhkp9JwLdxu1Fp/view?usp=drivesdk