घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस अटक.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 25, 2020


चंद्रपूर:- कुलूपबंद घरातील लॉकर तोडून सोन्याच्या दागिन्यासह रोकड पळविणाऱ्या अल्पवयीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख दोन हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रपूर शहरातील शामनगर वार्डातील माया रेगुंडवार यांचे कुलूपबंद घर फोडून लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे जाताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून संशयित अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, संदेश आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, गजानन नागरे, जावेद सिद्दीकी, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, कुंदनसिह बावरी आदींनी केली.