चौदावीच्या ऐवजी सोळावीचे आयोजन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- मुलींनीच वडिलांच्या तिरडीला खांदा दिला. मुलींनीच वडिलांच्या चितेला अग्नि दिला. अशा घटना नेहमीच समाजात घडत असतात. परंतू वडिलांचे निधन झाल्यानंतर १६ दिवसांनी मुलांनी त्यांच्या चौदावीच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या प्रसंगाचा अनुभव भद्रावतीकरांनी नुकताच घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील गुरुनगर शिक्षक वसाहतीतील रहिवाशी आणि सेवानिवृत्त जि.प.प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आनंदराव लक्ष्मणराव गरमडे यांचे दि.१६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. आनंदराव गरमडे यांचा वाढदिवस दरवर्षी त्यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या उत्साहाने साजरा करायचे.यंदाही दि.१ जानेवारी रोजी त्यांचा ८३ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा असा कुटुंबातील सदस्यांचा बेत होता. परंतू ८३ वर्षे पूर्ण होण्याच्या १६ दिवस आधीच काळाने त्यांना त्यांच्या कुटुंबापासून कायमचे दूर सारले.परंतू 'बाबांचा वाढदिवस' साजरा करायचाच हा विचार त्यांच्या मुलांना स्वस्थ बसू देत नव्हता.त्यांचे विनायक नामक मोठे सुपुत्र चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.तर लहान सुपुत्र हेमंत हे माजी सैनिक आहेत. आज आम्ही जे काही आहोत, ती आमच्या बाबांची पुण्याई आहे.त्यांच्याच प्रेरणेने आम्ही घडलो.आजही बाबा आमच्या सोबतच आहेत,असे आम्हा सर्वांना वाटते.जन्म-मृत्यू हे तर ठरलेले आहेतच.मृत्यू एक दिवस प्रत्येकाला येणारच आहे.परंतू बाबांनी जे आम्हाला संस्कार आणि प्रेरणा दिली. ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.बाबांचा मृत्यू झाला असे आम्हाला वाटतच नाही.त्यामुळे दि.१ जानेवारी या बाबांच्या जन्मदिनी केक कापून बाबांचा वाढदिवस साजरा करायचा आणि चौदावीचाही कार्यक्रम याच दिवशी घ्यायचा असे ठरविल्याचे विनायक गरमडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
आनंदराव गरमडे यांचा मृत्यू म्हणजे १६ या अंकाचा त्रिवेणी योग ठरला आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख १६ डिसेंबर आहे. ते त्यांचे मूळ गाव वडेगाव (गुळगाव) येथे दरवर्षी एका धार्मिक कार्यक्रमाकरीता न चुकता जायचे ती तारीखही १६ डिसेंबर आहे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करण्याकरीता शिल्लक असलेल्या दिवसांची संख्याही १६ च आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबात दर महिन्याला घुगरी काला करुन जगन्नाथ बाबांची उपासना केली जाते,तो तारखेचा अंकही १६ च आहे.
आनंदराव गरमडे यांचे घराणेच आध्यात्मिकतेवर भर देणारे होते.आध्यात्मिक मार्गातूनच त्यांचा जन्म आणि मृत्यू झाला.जेव्हा आनंदरावांचा जन्म झाला, तेव्हा त्यांचे आजोबा लक्ष्मणराव विठोबा गरमडे यांनी कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, या मुलाच्या जन्माने मला अतिशय आनंद झाला असून याचे नाव 'आनंद' ठेवा, मी पंढरीला चाललो असे म्हणून ते पंढरपूरला घर सोडून निघुन गेले ते पुन्हा परतलेच नाही.त्यामुळेच आजोबांच्या सांगण्यावरुन गरमडे गुरुजी यांचे नाव 'आनंद' ठेवण्यात आले. अनेक वर्षापासून त्यांचे मूळ गाव वडेगाव येथे दि.१६ डिसेंबर रोजी वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.या कार्यक्रमाला ते आवर्जून जात असत. त्यांच्या मातोश्री गं.भा.भागेरथाबाई यांचा मृत्यू गौरी विसर्जनाच्या दिवशीच झाला. त्यांची पुण्यतिथीही ते दरवर्षी भजन-पूजन करुन साजरी करायचे.त्यांच्या मृत्युच्या दिवसापासून ते चौदावी पर्यंतही त्यांच्या घरी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.त्यात चवथ्या दिवसापासून रोज १२ दिवस पर्यंत 'गरुड पुराण' वाचण्यात आले. १३ व्या दिवशी श्री.गुरुदेव भजन मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.१ जानेवारी हा आनंदरावांचा जन्म दिवस असल्याने चौदावीचा कार्यक्रम ३० डिसेंबरला न घेता १ जानेवारीला घेण्यात आला.त्याला सोळावी असे संबोधल्या गेले.या दिवशी घराच्या अंगणात मंडपात गरमडे गुरुजी यांनी १९६२ ला डी.एड.चे प्रशिक्षण घेतल्यापासून डिसेंबर २०२० पर्यंत विविध प्रसंगांची छायाचित्रे असलेले बॅनर लावून त्यावर 'बाबा तुम्ही परत या' असे ठळक अक्षरात शिर्षक लिहिण्यात आले.तसेच एका टेबलवर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन केक कापण्यात आला.याप्रसंगी पांडुरंग ताजने गुरुजी लिखित 'श्री.संत जगन्नाथ बाबा भक्ती अभंग गाथा' या पुस्तकाच्या प्रती निमंत्रितांना वितरित करण्यात आल्या.या आगळ्या-वेगळ्या 'चौदावी' मुळे भद्रावतीकरांमध्ये कुतुहलाचा विषय निर्माण झाला आहे.