दयाशंकर तिवारी नागपूर शहराचे ५४ वे महापौर; काँग्रेसचे रमेश पुणेकर पराभूत.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 05, 2021
नागपूर:- दयाशंकर तिवारी यांची मंगळवारी महापौरपदी निवड करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. ते शहराचे ५४ वे महापौर ठरले. ते प्रभाग १९ चे नेतृत्त्व करतात. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

महापौरपदाच्या १३ महिन्यांच्या कालावधीसाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडली. महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड निश्चित होती. परंतु, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने उत्सुकता वाढली होती.


सर्व नगरसेवक मोबाईल, लॅपटॉपवरून प्रक्रियेत सहभागी झाले. एकाचवेळी सर्व नगरसेवक सामील होणार असल्याने तांत्रिक बिघाडाची शक्यता होती. त्यामुळे झोननिहाय प्रभागातील नगरसेवकांच्या मताची नोंद पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. झोननिहाय मतदान झाल्यामुळे प्रक्रियेला चांगलाच वेळ लागला. अखेर दयाशंकर तिवारी यांना १०७ मते पडली. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना २७ मते पडली.

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दयाशंकर तिवारी यांना विजयी घोषित केले. काँग्रेसकडून रमेश पुणेकर व मनोज गावंडे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीपूर्वी मनोज गावंडे यांनी अर्ज मागे घेतल्याने पुणेकर विरुद्ध तिवारी अशी लढत झाली. अपेक्षेप्रमाणे तिवारी महापौरपदी निवडून आले. तांत्रिक बिघाडामुळे लिंक न मिळाल्याने काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, गार्गी चोप्रा, अपक्ष आभा पांडे, सेनेचे किशोर कुमेरिया मतादानापासून वंचित राहिले.