कोनाळी डोंगर (ता. जळकोट जि. लातूर) या गावात नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एका युवा उमेदवाराला अवघी १२ मते पडली. त्याचा दारूण पराभव झाला. असे असूनही या युवकाने त्याला मतदान करणा-या 'त्या' १२ मतदारांचे आभार एक डिजीटल फलक झळकवून मानले आहेत. विकास शिंदे असे या पराभूत उमेदवाराचे नाव असून त्याने लावलेल्या डिजीटल फलकाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
पराभूत उमेदवार विकास शिंदे याला ग्रामपंचायत निवडणुकीत अवघी १२ मते मिळाली. पण तो पराभवाने खचून गेलेला नाही. १२ मतांमध्येही त्याने सकारात्मकता पाहत या १२ मतदरांचे आभार मानले आहेत. त्याने डिजीटल फलक लावून १२ मतदारांबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण त्याने झळकावलेल्या डिजीटल फलकामधील मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विकासच्या या फलकाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निवडणुकीत हारल्यानंतर असा फलक लावून आभार मानणारा विकास शिंदे हा पहिलाच उमेदवार असेल. विकासचं निवडणूक चिन्ह शिट्टी होतं. फलकामधील मजकूर खालीलप्रमाणे आहे.
काय आहे डिजीटल फलकातील मजकूर?
वाटलं होतं गड्या आपला गाव बरा... पण तुम्ही म्हणाला पसारा भरा.. आम्ही जातो आमच्या गावा... आमचा राम राम घ्यावा, समाजानं धिकारलं...गावानं नाकारलं...पण आम्हाला देश स्विकारणार..! आमच्यावर जिवापाड प्रेम करणा-या बारा मतदरांचे जाहीर आभार.. ना जातीसाठी.. ना धर्मासाठी.. आमचा लढा मातीसाठी... जगेन तर देशासाठी.. मरेन तर देशासाठी.. मला ज्यांनी बारा मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली त्यांचे सात जन्म उपकार फिटणार नाहीत. तुमच्या मताच देशात नाव करेन. खंडेराया नगराचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर.
सोमवारी राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. बर-याच ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून नवख्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर अनेक ठिकाणी महिला मोठ्या संख्येने निवडून आल्या आहेत.