मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर.

Bhairav Diwase
 
 Bhairav Diwase.           Jan 21, 2021
कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावरही मात करुन यंदा दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिराने घेतल्या जाणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख अखेर आज जाहीर केली आहे.

"इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असल्यानं यावेळीच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही वारंवार याबाबत विचारणा करण्यात येत होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असं सांगितलं जात होतं.

अखेर आज वर्षा गायकवाड यांनी परीक्षांचा कालावधी जाहीर करुन राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दिला आहे. कोरोनाचा काळ लक्षात घेता या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेणं अतिशय कठीण असल्याचं मत याआधीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागण्याची शक्यता आहे.

इयत्ता १० वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाईल. तर निकाल ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे.

इयत्ता १२ वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेतली जाईळ. तर निकाल जुलै २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाईल.