Top News

कोरोना रूग्ण वाढण्याच्या शक्यतेमूळे गडचिरोली जिल्हयात पून्हा लॉकडाऊनचे संकेत?

नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी:- जिल्हाधिकारी दीपक सिंगला
Bhairav Diwase.     Feb 17, 2021
गडचिरोली:- राज्यात विविध शहरात कोरोना रूग्णांची वाढ विचारात घेता जिल्हयातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना रूग्ण वाढू नये म्हणून जिल्हयात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज केले. राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीनंतर ते संबंधित विभागाच्या प्रमुखांशी बोलत होते. ते म्हणाले नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, शाररिक अंतर पाळणे तसेच गर्दी न करणे याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी त्यांनी यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या.



जिल्हयात रूग्ण संख्येत घट झाली असली तरी काही प्रमाणात पून्हा रूग्ण वाढ दिसत आहे. तसेच ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस विभागाने दक्षता बाळगावी असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात नागरिकांनी कोरोना बाबत शिस्त नाही बाळगली तर पुन्हा काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये यात्रा, जयंती तसेच लग्न समारंभ या ठिकाणी नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहतात अशा वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. त्यामूळे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी म्हणून पोलीस तसेच आरोग्य विभागाने योग्य ती कारवाइ करणे आवश्यक आहे असे ते पुढे म्हणाले.

सद्या कोरोना लसीकरण सुरू आहे व रूग्ण संख्याही या महिन्यात कमी झाली यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेला असल्याचे जाणवत आहे. परंतू राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रूग्ण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामूळे गडचिरोलीत यापुढे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अन्यथा त्यांनी पून्हा जिल्हयात कठोर निर्णय घेवून लॉकडॉऊन सुरू करण्याचे संकेत यावेळी बैठकीत दिले. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी उपसिथत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने