आदर्श घाटकुळला आर.आर.पाटील जिल्हा सुंदर (स्मार्ट) गाव पुरस्कार प्रदान.

Bhairav Diwase
७० लाखाचा पुरस्कार; गावकऱ्यांचे अभिनंदन.
Bhairav Diwase.        Feb 17, 2021
पोंभुर्णा:- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत राज्यात आदर्श ग्राम ठरलेल्या घाटकुळ ग्रामपंचायतीला आज आर.आर.पाटील जिल्हा स्मार्ट/सुंदर गाव पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राहूल कर्डीले सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्याम वाखर्डे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.कलोडे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. घाटकुळच्या मा.सरपंच प्रिती मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, मा.ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, स्वेच्छाग्रही राम चौधरी,  संगणक चालक आकाश देठे, रोजगार सेवक वामन कुद्रपवार, कर्मचारी अनिल हासे, उत्तम देशमुख, ग्रामसंघ अध्यक्ष देठे यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत घाटकुळ गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून दोन वर्ष काम करता आले, याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे. यादरम्यान गाव राज्यात आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त ठरले. स्वत: पद्मश्री पोपटराव पवारांनी गावाला येवून परिक्षण केले. ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, हरित व स्वच्छ ग्राम पुरस्कार व आता ७० लाखाचा तालुका व जिल्हा आर.आर.पाटील स्मार्ट/सुंदर गाव पुरस्कार देखील गावाला मिळाला. नाविण्यपूर्ण उपक्रम व लोकसहभाने गावाच्या विकासाचा चढता आलेख जिल्हा व राज्यात दिशादर्शक ठरला.

काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, कुठलाच गाव पुरस्काराने मोठा होत नाही. तो केवळ कामाचा सन्मान असतो. पुरस्कार न मिळालेली अनेक गावे देखील ख-या अर्थाने आदर्श व स्मार्ट आहेत. फरक इतकाच की कधी अशा गावांची हवी तशी दखल होत नाहीत. प्रचंड परिश्रम झाले, पुरस्कार मिळाले की नेमके त्याचवेळी गावात सत्ता व अर्थकारणासाठी राजकारण सुरु होते. यातून पुरस्कार प्राप्त गावे देखील भकास झालेली उदाहरणे कमी नाहीत. 'गाव हाच माझा पक्ष' अशी शपथ घेवून काम करण्याची गावागावात गरज आहे. पक्षाचे झेंडे गावातील तरुणांच्या हातात देण्यापेक्षा त्यांच्या जीवनाला दिशा देणारे पुस्तके देण्याची गरज आहे. निस्वार्थ व निपक्ष माणसांची, वैचारिक चळवळींची तितकीच जोड आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जरी आदर्श व स्मार्ट म्हणून गावे पुढे आलीत, तरीही विकास म्हणजे केवळ रस्ते, नाली बांधकामावरुन अंदाज न बांधता गावाच्या संस्कारातून, विचारातून, नाविण्यपूर्ण संकल्पनेतून पुढे यावीत. महाराष्ट्राला संताचा वारसा आहे. त्यांच्या विचारातून ख-या अर्थाने गावात गावपण नांदत असेल तर अशी गावे नक्कीच आपण आदर्श मानायला हरकत नाही. 

घाटकुळ अल्पावधीतच जिल्हा व राज्यात दखलपात्र ठरले. गावक-यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे हे फळ आहे. गावासाठी दिवस रात्र खपणा-या हातांचे मनापासून अभिनंदन. मार्गदर्शन करणारे सर्व अधिकारी वर्गाचे आभार. घाटकुळची वाटचाल नेहमीसाठी समृद्ध, दिशादर्शक व आदर्श रहावी, आता देशपातळीवर सकारात्मक प्रयत्नातून दखलपात्र ठरावे, यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.