Top News

दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर.

Bhairav Diwase.    Feb 17, 2021


मुंबईः- कोरोना संकटामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने केली. नव्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ तसेच दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होईल.

दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक https://mahahsscboard.org/ या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

कोरोना संकटामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरुवातीचे काही महिने व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने शाळा कॉलेजांचे वर्ग सुरू होते. कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शाळा आणि कॉलेज परंपरागत पद्धतीने सुरू करण्यात आली. वर्ग सुरू झाले तरी अद्याप अनेक ठिकाणी सर्व विद्यार्थी वर्गात येऊ शकत नसल्यामुळे वर्गातून व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू झाल्या. यामुळे जे विद्यार्थी वर्गात नसतील त्यांना घरुन शिक्षण घेणे शक्य झाले.

शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. पण वार्षिक परीक्षेसाठी काय करावे यावरुन संभ्रम होता. अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन घ्यायच्या असा निर्णय झाला. या निर्णयानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पण नंतर या वेळापत्रकात बदल करुन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. हे वेळापत्रक लवकरच शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल, असे जाहीर करण्यात आले.

आधी बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २९ मे २०२१ आणि दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या काळात होणार होती. सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होईल. तसेच दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होईल. नव्या वेळापत्रकात बारावीच्या परीक्षेचा कालावधी आठ दिवसांनी कमी केला तर दहावीच्या परीक्षेचा कालावधी ११ दिवसांनी कमी केला आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलै महिना संपण्याआधी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी जाहीर केला जाईल.

यंदा कोविड प्रोटोकॉलचे भान ठेवून राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये परीक्षा केंद्र तयार केली जातील. विद्यार्थ्यांना घराजवळचे परीक्षा केंद्र देण्यावर शिक्षण मंडळाच्या प्रशासनाचा भर आहे. परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टंस राखण्याचे बंधन असेल. परीक्षा केंद्रावर हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची अथवा साबण आणि पाण्याने स्वच्छ धुण्याची व्यवस्था असेल. परीक्षा केंद्रावरील प्रशासन दोन विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंस राखण्याचे भान ठेवून आसन क्रमांक निश्चित करणार आहे. तब्येत बरी नसल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने परीक्षा केंद्राच्या प्रशासनाशी संपर्क साधावा, त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जाईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने