Top News

'त्या' जागेची विक्री रद्द करुन आरोपीस अटक करा. अन्यथा तीव्र आंदोलन करु.

कुंभार समाज विकास संस्थेचा पत्रपरिषदेत इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कुंभार रोजगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या.भद्रावती या संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेच्या मालकीच्या येथील गांधी चौकातील १००० चौ.फूट जागेची अवैधरित्या परस्पर विक्री केल्याने ती विक्री रद्द करुन आरोपीस अटक करण्यात यावी अन्यथा समस्त कुंभार समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा श्री.संत गोरोबा काका कुंभार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष नरेश बोरसरे यांनी पत्रपरिषदेत दिला.

            पत्रपरिषदेत नरेश बोरसरे यांनी सांगितले की, कुंभार रोजगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या.भद्रावती या संस्थेची स्थापना १९५७ साली झाली.या संस्थेची रितसर नोंदणी करण्यात आलेली आहे. श्रावण गोविंद कपाट हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कोरोना काळात दि.२१ मे २०२० रोजी संस्थेच्या मालकीची येथील गांधी चौकातील १००० चौ.फूट जागा मनोहर पोचय्या इरकुलावार यांना विकली. याकरीता श्रावण कपाट यांनी दि.२७/०८/२०१६ रोजी तसेच पुन्हा दि.२८/०८/२०१७ रोजी संस्थेच्या वार्षिक साधारण  सभा झाल्याचे ठराव तयार करुन त्यावर सभांना गैरहजर असणा-या तसेच सभांच्या तारखांपूर्वीच मय्यत झालेल्या सभासदांचे बनावट सही/अंगठे केलेले आहेत. याबाबत संजय विठ्ठल गिरोले आणि कवडू यशवंत वाणी यांनी दि.१९ जानेवारी २०२१ रोजी भद्रावती पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली. तसेच विक्रीसंदर्भात  कोणत्याही वर्तमानपत्रात जाहिरात न देता एक पाम्प्लेट तयार करण्यात आले असल्याचाही आरोप बोरसरे यांनी पत्रपरिषदेत केला.

                  संजय गिरोले आणि कवडू वाणी यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन श्रावण कपाट आणि मनोहर इरकुलावार यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा पोलिस स्टेशनसमोर उपोषणाला बसू असाही इशारा समस्त कुंभार समाजाच्या वतीने बोरसरे यांनी पत्रपरिषदेत दिला. अपहार केल्याच्या संदर्भातील तक्रारीच्या प्रती जिल्हा पोलिस अधीक्षक,तहसीलदार आणि सहायक निबंधक यांना पाठवून कारवाईची मागणी करण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.  सदर जागेची झालेली विक्री रद्द करण्यात यावी.तसेच कुंभार समाजातील सर्व सदस्यांना सदर संस्थेचे सदस्यत्व देण्यात यावे.अशीही मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली.

                        पत्रपरिषदेला सुनील ठाकरे, संजय गिरोले, कवडू वाणी, रामकृष्ण खोबरे, दशरथ वरवाडे, सतीश बोरसरे, अजय बुरबांदे, सतीश वाणी, अरविंद खोबरे, विठ्ठल पाडवार, विमल खापनवाडे, गयाबाई वाणी आणि अन्य कुंभार समाज बांधव उपस्थित होते.                        
                       
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे:- श्रावण कपाट
याबाबत श्रावण कपाट यांच्याशी संपर्क साधला असता विरोधकांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि सारासार खोटे असून त्यात काही सत्य नाही.त्यांनी पाठविलेल्या नोटीसचे उत्तर त्यांना वकीलामार्फत पाठविण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.

प्रकरणाची चौकशी चालू आहे:- ठाणेदार पवार
यासंदर्भात पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असून प्रकरण मोठे असल्याने चौकशी चालू आहे. अशी प्रतिक्रिया भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार पवार यांनी पत्रकारांना दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने