मुंबई:- राज्यातील महाविद्यालय सुरू कधी होणार याची उत्सुकता लागली होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जी आर काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितले. युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उदय सामंत म्हणाले.
महाविद्यालयं सुरू होत असताना यूजीसीने देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे, संबंधित जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणांना पायाभूत सुविधांची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. करोना संसर्गाच्या प्रमाणाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे व त्यानंतर विद्यापीठांनी आपली महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ही विद्यापीठं महाविद्यालयं १५ फेब्रवारीपासून सुरू करू शकतात, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यता आला आहे.
करोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मागील दोन-तीन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर २०२० पासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. तर, महाविद्यालये व शिक्षणसंस्था सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी असल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते.
लोकसत्ता.....