Top News

स्थानिकांच्या रोजगारासाठी मनसेचा जीआरएन कंपनीत राडा.

Bhairav Diwase.           Feb 18, 2021
चंद्रपूर:- वेकोली भटाळी अंतर्गत कार्यरत जीआरएन कंपनीत विनंती करूनही रोजगार न देता परप्रांतीयांना कामावर ठेवून मुजोरी करणाऱ्या जीआरएन कंपनीच्या विरोधात अखेर स्थानिक गावकरी, बेरोजगार युवकांच्या संयमाचा बांध फुटला. मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात नोकरीच्या मागणीसाठी गेलेल्या स्थानिक युवक व गावकऱ्यांनी जीआरएन कंपनीविरोधात संताप व्यक्त करीत वाहन, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड करीत आपला रोष व्यक्त केला. याबाबात दुर्गापूर पोलीस ठाण्यात सुमारे ४० जणांवर कलम ३९५, ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक स्थानिकांचे रोजगार हिरावल्यामुळे त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना वेकोलि भटाळी खाणीत जीआरएन कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असल्याने गावकरी तसेच स्थानिक बेरोजगारांना काम मिळण्याची मोठी आशा होती.

मात्र जीआरएन कंपनीने कोरोना काळातही परप्रांतीय युवकांना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत कामावर ठेवले व गावकरी स्थानिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक बेरोजगार मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात जीआरएन कंपनी व्यवस्थापकाकडे चकरा मारीत नोकरीची विनंती करीत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बुधवारी मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात जीआरएन कंपनी व्यवस्थापनाकडे गावकरी, स्थानिक बेरोजगार नोकरी मागण्यासाठी गेले असता कंपनीने त्यांना नकार देताच बेरोजगारांच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी कंपनीचे जे साहित्य मिळेल त्याची नासधूस करण्यास सुरुवात केली. कंपनीचे वाहन, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड करण्यात आली. याबाबत सुमारे ४० जणांवर कलम ३९५, ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने