युवकाचे सडलेले प्रेत आढळले, घातपाताचा संशय.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती येथून जवळच असलेल्या पिर्ली शेतशिवारात युवकाचे सडलेले प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली असून घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. 

             दि.७ मार्च रोजी रात्री ९ वाजताचे दरम्यान एका अज्ञात इसमाचे प्रेत पिर्ली येथील वामन देठे यांच्या शेताजवळ नाल्यात आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर भद्रावती पोलिसांना कळविण्यात आले. गावकऱ्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता डाव्या हातावरील अपघाताच्या खुणेवरुन आणि त्याच्या पायातील स्लिपर चप्पलवरुन तो आपल्याच गावातील प्रवीण शामराव नागोशे (३२) असल्याची खात्री पटली.

         पोलिसांनी सदर प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करुन नातेवाईकांना सुपूर्द केले. सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रवीण हा स्वभावाने साधा सरळ होता. गावातच मोलमजुरी करायचा. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्ये असून त्याची पत्नी खोकरी येथे माहेरी गेली होती. प्रवीणचा मृत्यू घातपाताचा प्रकार असू शकतो. त्यामुळे योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने