राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत..!

Bhairav Diwase
फिनिक्स बहुउद्देशिय संस्थेद्वारे वनाधिकाऱ्यांना निवेदन.
Bhairav Diwase.        March 24, 2021
पोंभूर्णा:- महाराष्ट्र राज्यात जवळपास पाच ते दहा हजार सर्पमित्र वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धडपडत असतात. मात्र   वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणताही वन्यजीव पकडणे अथवा बंदिस्त करणे कायद्याने गुन्हा ठरतो. पन मणुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे लोकांपासुन व लोकांचे सापापासुन संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही,किंवा तसे मनुष्यबळ सुध्दा नाही. त्यामुळे निसर्गातील महत्वाचा व उपयोगी असलेल्या सापाच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना कायद्याबाहेर जाऊन काम करावे लागत आहे. कोणतीही योग्य माहिती नसतांना काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने साप पकडले जात आहेत. परिणामी अनेक सापांचे व लोकांचे सुध्दा जीव गेलेले आहेत. 

एका दिवसाला महाराष्ट्रभरात किती साप पकडले, कोणी पकडले, कुठे पकडले, ते व्यवस्थित जंगलात सोडले की नाहीत याची कोणतीही नोंद वन विभागाकडे नाही. त्यामुळे साप जास्त दिवस बंदिस्त ठेवणे, दुर्मिळ सापांची परस्पर देवाणघेवाण करणे, सापांचे खेळ करणे व तस्करी सारख्या घटना वाढत आहेत. काही ठिकाणी तर सर्पमित्र असल्याची बतावणी करून साप पकडण्याच्या नावाखाली पैशाची उकळण सुध्दा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्पमित्रांना कायद्यात राहुण शिस्तबद्ध पद्धतीने काम करता यावे, यासाठी राज्यातील सर्व सर्पमित्रांकडून राज्यातील, जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी व वनाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येत असल्याचे पोंभूर्णा फिनिक्स संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शेंडे यांनी सांगितले. 

*सर्पमित्रांच्या प्रमुख मागण्या:-* राज्यातील सर्पमित्रांची साप पकडण्याच्या अनुभवाची खात्री करून वनविभाग कार्यालयात रितसर नोंद करण्यात यावी, एखाद्या घरात साप आढळल्यास पहिल्यांदा वन विभागाशी संपर्क व्हावा म्हणून कार्यालयाने प्रत्येक गावात संपर्क नंबर द्यावा, वन विभागाकडून सर्पमित्राला पाचारण करण्यात यावे, नोंदनीकृत सर्पमित्राव्यतिरीक्त साप पकडणाऱ्यावर कारवाई करावी, सर्पमित्रांना युनिफार्म, ओळखपत्र व सेफ्टीकिट द्यावी, सर्पमित्राला दंश झाल्यास वैद्यकीय खर्च शासनामार्फत पुरविण्यात यावा इत्यादी प्रमुख मागण्यासह आणखीही काही मागण्या करण्यात आल्या असुन पुढील दिड महिण्यात म्हणजेच ७ मे पर्यंत या मागण्यांची पुर्तता करावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्र आपले काम बंद करतील असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी फिनिक्सचे अध्यक्ष श्रीकांत शेंडे, प्रदीप कोडापे, रूपचंद गुरूनुले व पदाधिकारी उपस्थित होते.