गडचिरोली:- गडचिरोलीत नक्षवाद्यांच्या कारवाया सुरुच आहेत. गडचिरोलीतील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रस्ते कामांना नक्षवाद्यांनी विरोध करत धमकी देणारे बॅनर झळकावले आहे. या बॅनरमध्ये काम थांबवा नाही तर, याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिरोंचा ते अंकिसा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील 38 कोटींचे काम प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेला पेंटीपाका परिसरात नक्षली बॅनर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॅनरवर 'बोगस काम बंद करो इसका अंजाम मिलेगा' असा उल्लेख करून भा.क.पा माओवादी असे लिहिले आहे. कामाचा दर्जा बरोबर नसल्याचे आक्षेप माओवाद्यांनी नोंदवून धमकी देणारे बॅनर लावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.