आजपासून प्रतिदिन ५०० भाविकांना घेता येणार मार्कंडा देवस्थानचे दर्शन.

Bhairav Diwase
0
तहसिल कार्यालयामध्ये करण्यात आली आहे टोकनची व्यवस्था.
Bhairav Diwase. March 12, 2021
चामोर्शी:- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भाची काशी ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवाचे दर्शन घेण्यासाठी आजपासून प्रतीदिन 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमीत्य चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात.
  यावेळी कोरोना संसर्गामूळे महाशिवरात्री दिवशी दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता आज 13 मार्च पासून दैनंदिन 500 भाविकांना तहसिल कार्यालयाकडून टोकन घेवून मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानूसार आवश्यक खबरदारी घेवून जिल्हाधिकारी यांनी परवानगी बाबत नवीन आदेश निर्गमित केले आहेत, यामध्ये एकावेळी 50 भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर परीसरात परवानगी देण्यात येणार आहे. एका दिवशी 500 भाविक दर्शन घेतील. तसेच प्रत्यक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात 5 भाविक एकावेळी जाण्यास मूभा असणार आहे.
          
 टोकन घेण्यासाठीची प्रक्रिया.......
तहसिल कार्यालय चामोर्शी येथे मार्कंडा देव दर्शनासाठी टोकनची व्यवस्था करण्यात आली आहे. एका व्यक्तीला जास्तीत जास्त 5 व्यक्तींचे टोकन घेता येणार आहे. अशा प्रकारे एका दिवसाठी 500 भाविकांच्या मर्यादित टोकन वाटप करण्यात येणार आहे.
 
भाविकांनी कोरोना संसर्गाबाबत काळजी घेणे अनिवार्य......
टोकन घेणेसाठी येताना नागरिकांनी मास्क लावणे, शारिरीक अंतर ठेवणे अनिवार्य आहे. तसेच मार्कंडा देवस्थान ठिकाणी मास्क वापर बंधनकारक असणार आहे. दर्शन घेताना व त्या परिसरात शारिरीक अंतर पाळणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी उपस्थित प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालनही करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील सर्व भाविकांना कोरोना बाबत आवश्यक खबरदारी घेवून देव दर्शन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)